या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

चारोळी

कशास यावे कुणी जीवनी
का जडवावी प्रीती
अर्ध्यावरती डाव सोडूनी
का तोडावी नाती

- सुरेश

तु आणी मी (२ ओळी)

मी बंधन, तू परीसीमा
मी लंडन, तू हीरोशीमा
------------- ooooo ------------

मी सुंदर, तू लावण्य
मी बंदर, तू अरण्य
------------- ooooo ------------

मी नशा, तू दारू
मी काश्या, तू पारू
------------- ooooo ------------

मी रस्ता, तू गाड़ी
मी पायजमा, तू नाडी
-------------- ooooo -------------

मी सुर, तू गळा
मी शेत, तू मळा
------------- ooooo ------------

मी छत्री, तू पाऊस
मी कीबोर्ड, तू माऊस
------------- ooooo ------------

मी चौघडा तू सनई
मी मशाल तू समई
------------- ooooo ------------

मी अभंग फुगडी
मी अथांग तू लंगडी
-------------- ooooo ------------

तू नदी मी सागर
तू मडका मी घागर
------------- ooooo ------------

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

पक्षिण

मी कैदी पक्षिण, पायांत बेडी
अस्मानवेडी होते खुळी
शुन्यात फिरते, पिंजर्‍यात झुरते
उडायची मुभा मज नाही मुळी

भिरभिर फिरुनी, दाणे टिपावे
तुटूनी पडावे कणीसांवरी
कटोरीत खाते, ओंजळीने पिते
अल्लड पाखरू कारागृही

वार्‍याशी बिलगोनी, किलबिल गावे
वाटे झुलावे डहाळीवरी
अता पापण्यांच्या हलती डहाळ्या
अगतिक कसरत तारेवरी

फुलवून पंख, नभ पांघरावे
स्वैर विहार करावा जळी
कंठात दोर, नाकात तार
स्वैराचारास पडली बळी

उंच उडावे, झोकोनी द्यावे
ढगांशी करावा कधी सामना
पक्ष खुटारू, झुरूमुरू घारु
लुळ्या पाखराच्या मुक्या यातना

फोडोनी टाहो, तोडोनी दावे
लक्ष्य बनावे निषादापुढे
उडणेही नाही, मरणेही नाही
गाते विराणी बहिर्‍यापुढे

सुरेश >>>
१८.०८.२०१०

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

कूट चारोळ्या

"कूट कविता" हा जुना काव्य प्रकार आहे. श्री विठ्ठल नावचे एक जुने कवी होऊन गेले. त्यांनी रुळवलेला हा प्रकार पुढे श्री. पुरुषोत्तम हरिहर जोशी यांनी सुरु ठेवला. ह्या काव्य प्रकारात कवितेद्वारे एखादा शब्द ऒळखण्यास सांगितले जाते. श्री. पुरुषोत्तम जोशी यांचीच एक रचना उदाहरण म्हणून खाली देत आहे.

आद्याक्षरारहित तो इस्लामी संत
मध्याक्षरारहित ते नाते पसंत
अंत्याक्षरारहित तस्कर ना म्हणावे
सर्वाक्षरा मिळुन ते उजेडी पहावे

                       -  पुरुषोत्तम जोशी

इस्लामी संत = वली
नाते पसंत = साली
तस्कर म्हणजे चोरच्या विरुद्ध = साव
उजेडी पहावे = सावली
उत्तर =  सा व ली

अशा कूट कविता नाहीत पण ह्या काव्य प्रकारातल्या काही स्वरचीत चारोळ्या मी इथे देत आहे. प्रत्येकाचे उत्तर सर्वात शेवटी दिलेले आहे.

1        आद्याक्षरारहित तळकट खाद्य
          अंत्याक्षरारहित आलिंगन
          मध्याक्षरारहित पहाड़ शिखर
          सर्वाक्षरा मिळुन पाखरू सुंदर

       मध्याक्षर खाता अर्क असे
          आद्याक्षर वगळता वधू नसे
          अंत्याक्षर चोरता चोरही नसे
          सर्वाक्षरी एक झाड असे
       
3        पहिला दुसरा रानटी बैल
          दुसरा तीसरा घाव खोल
          आध्य अंत्य गाभा गीर
          सर्वाक्षरी अशी भाजी चीर

4        मगज, गाभा दुसरा तिसरा
          पहिला तिसरा नर नसे
          सर्प असे पहिला दुसरा
          सर्वाक्षरी शब्द चतुर असे
                
                     - सुरेश >>> 
 
उत्तरे:
1  =  कवडा
2  =  सावर
3 =  गवार
4 =  नागर

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

यमधर्म

तू येशील याची चाहूल लागली होती
पण यमद्वितीयेदिवशी येशील अशी कल्पना नव्हती.
भर दिवाळीत रंगाचा बेरंग करताना...
यमीलाही विसरशील असे वाटले नव्हते

भर दिपवाळीत दिवा मालवून ...
आकाशकंदीलात काळोख पसरवलास
भाउबिजेदिवशी भाईला उठवून...
निरांजनीच्या वाती विझवल्यास.

तीनशे पासष्ट दिवस विनाशकार्य करतोस...
यमद्वितीयेदिवशी सुध्दा तुलाच सुट्टी नाही ?
भाउबिजेदिवशी बहिणीना रडवतोस...
तुझ्या नोंदवहित एखादा वर्ज्यदिन सुध्दा नाही ?

तुला दोष देण्यात तरी काय तथ्य
सटविने लिहीले प्रारब्धी, तेच अंतिम सत्य
जन्ममरणाच्या फेर्‍यात, तूच एक अटळ सत्य
नातीगोती, आप्तेष्ट बाकी सर्व मिथ्य.

पण माझी एक विनंती ऐकशील का रे?
मला न्यायला येशील तेव्हा सणासुदीला येऊ नकोस
काही दिवस अगोदर आलास तरी चालेल
पण दिवाळीच्या रोषणाईत अंधःकार पसरु नकोस.


- सुरेश
22.11.2008

मी इथे जे लिहिले आहे ती कविता नसून मनातले विचार शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला इतकंच.

गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

तिमीर

तेजोमयी दिपोत्सवी,
तिमीर वरचढ ठरला
दारी विझवून वाती त्याने,
सैराट पक्षी हेरला

अकाल काळपाश पडला
विहग बंदिस्त जाहला
गजब झडप... कंठशोष
द्विजराय गतप्राण झाला

आक्रंदुनी पिले-पांखरे,
सैरावैरा पळू लागली
घरट्यामाजी कोलाहल
पक्षीण टाहो फोडू लागली

चहू दिशांनी चिता पेटली,
सगे विसावले झाळीत
सभोवताली बघे बैसले,
मीठ टाकती आगीत

निष्पर्ण डहाळ्या हलू लागल्या
रावे फडफड करू लागले
पक्षीणीच्या चोचीबीना,
स्वये दाणे टिपू लागले

पिलावळीचे रुदन झाले
डोकीवरती मुंडन झाले
एक पक्ष घरटी उबवूनी,
आभाळ यात्री दिगंतरा गेले

नयनी वाती पुन्हा पेटल्या,
पक्षीण खोप्यात झुरु लागली
फिक्या फटफटीत आभाळी,
कृष्ण चंद्र निरखू लागली

सुरेश >>>
११-११-२००८

मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

छडा लागला रे (गझल)


तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे

मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे

अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे

फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे

तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला रे

पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे

सुरेश >>>
१४-१२-२००९

शुक्रवार, ५ जून, २००९

वात्सल्यसिंधु


















लावण्यखणी राणी, कुरंगनयना नारी
मितभाषी राजकन्या, वात्सल्यसिंधु भारी

दावुनी बोट तिजला, करती कुचाळ खोक
रूपगर्विता घमेंडी, म्हणती हसून लोक

टोचोनी जो तो बोले, देती उगाच दोष
गिळूनी जनांचे दंश, शमवी मनीचा त्वेष

ललनेस दुःख भारी, सांगेल कुणा कैसी
वरिता कठोर भासे, अंतरी साय जैसी

एकेदिनी परंतु, ऐकोनी आर्त टाहो
तोडोनी बंध सारे, तत्क्षणी घेई घावो

उचलूनी अर्भकास, भाळास भाळ लावी
व्याकुळ भूके बाळ, नयनांत तिच्या पाही

कवळूनी तान्हुल्यास, धरिले कुशीत जेव्हा
भळभळा स्तन्य वाहे, माय मातृकेचे तेव्हा

स्त्रवला ऊरात पान्हा, निजला पिऊनी कान्हा
विसरून पार गेली, पाळण्यात तिचा तान्हा

समजुन मूढ गेले, सौष्ठव कवडीमोल
रूप-बोल सारे फोल, वात्सल्य बहुमोल

सुरेश शिरोडकर >>>
 ४ जून, २००९

गुरुवार, २८ मे, २००९

निसर्गराजा (मालवणी)

उद्योग नाय धंदो, पोटापाण्याचो वांदो
झिलाच्या मनीऑर्डरवर बापाची नजार
निसर्गाच्या मर्जीवर कोकणाची मदार

आंब्यार मोहर फुटता, काजीर तवुर दिसता
झाडापेडाक लागता मळबटीची नजार
कसा वाजवचा आता चेडवाचा काजार?

भिरंडीर धोडे फुटतत, रंटूल तांबडे दिसतत
वैशाखात घालता वारो पाऊस धुमशान
भिरंडीच्या मुळार पडता रतांब्याचा शान

सुरंगीर कळो फुटता, देळ्यान देळो फुलता
वळीवाच्या पाऊसाक जोर खयसून येता
सोन्यावाणी पिवळो कळो ठिक्क काळो पङता

भाजी पोरसा पोसतत, हरयी दिसाक लागतत
ह्या सरकारी भार-नियमनचा धुमता असा मढा
मिरशेंगांच्या ताडार हडकी ढवळी हाडा

भातां पिवळी दिसतत, पिकान कन्यात वाकतत
पुनवसाचो तरणो पाऊस सरायक रीघ धरता
भातां निजान आडवार तरवो रुजान वाडता

आदो-मिरग सरता, पाऊस दडान बसता
बैल गेल्यार कुळवाडी झोपो असो करता
पुनवसात उतव बानान मळबाकडे बघता

निसर्गराजा कोकणात, झिम्मा-फुगडी घालता
निसर्गाच्या मेहरबानीवर झाडार पैसो दिसता
नायतर कोकणचो राजा झाडार हाडा टांगता

सुरेश शिरोडकर >>>
२६ मे २००९

शनिवार, २ मे, २००९

बुजगावणे



जेव्हा...
एक सच्चा चितारी समजून,
एका निष्पाप चित्ररेखेसारखी
तुझ्या रंगानी रंगत गेले;
तेव्हा...
तूझे ते रंगवणे "बोचकारणे" असेल;
याची पुसटशीही कल्पना नव्हती.

अरे रंगलाल...
रंगीला बनून, चेहर्‍यावर रंग फासून,
एका निष्पाप बाहुलीचे "बुजगावणे" बनवशील;
या तुझ्या रंगढ़ंगाची मुळीच जाण नव्हती.
बुजगावणे बनवून, मळ्यात रोवण्यापेक्षा;
ताईत बनवून, गळ्यात टांगली असतीस तर?
आयुष्यभर लटकत राहिले असते;
जन्मभर तुझीच पडछाया बनून,
तुझ्याबरोबर भटकत राहिले असते.

पण आता...
आता, मी बुजगावणे असून सुद्धा;
पीकाला सवकलेल्या "लंपटांना"
मुळीच बुजवित नाही.
हल्ली, अगदी बुजरे सुद्धा मला बिचकत नाहीत.
कुंपणानेच शेत खाल्यावर;
बुजगावणे तरी काय कामाचे?

सुरेश शिरोडकर >>>

शनिवार, २४ जानेवारी, २००९

दुही

का हो माजविता माणसात दुही
दूध नासवुनी कशापायी दही
पेटविता का हो सलोख्याची होळी
पिठ आंबवून कोणास आंबोळी

फुले कुस्करुनी कोणास ही शेज
अबलांच्या माथी का काजळाचे तेज
कोण गणगोत कोणाशी रक्षीता
श्वान बनुनीया पिंड का भक्षीता

कोणत्या शौर्याचे गाता हे पोवाडे
सताड ऊघडा गवाक्ष कवाडे
कोणत्या जयाचे ढोल बढवीता
नि:ष्पापींचे बळी कुणा चढवीता

कोणत्या जयाची ऊभारीता गुढी
तुम्हां पायतळी तुमचीच मढी
कुठल्या रंगाच्या पताका या हाती
स्वजन रक्ताचे डाग तुम्हां माथी

कुठल्या धर्माचे कुराण वाचीता
माणसे मारुनी काय हो संचीता
कोणत्या प्रभूला मनी साठवीता
जनी रक्तपात धर्मं बाटवीता

मानव्य रक्षण माणसाच्या हाती
सावजास आहे शिकार्‍याची भीती
माणसाची आज बिघडली मती
माणसास आहे माणसाची भीती

सुरेश शिरोडकर >>>
१७, जानेवारी २००९

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

सैतान कृत्य


कधी मंदिरी कधी राऊळी
कधी मशीदित शोधती
हिंदू-मुस्लिम, शिख-ईसाइ
ईश आप-दुजी वाटती

कुणी म्हणती ईश प्रभुला
कुणी येशू तर कुणी अल्ला
हिंस्त्र श्वापदे बनली सारी
करीती जनावरांपरी हल्ला

प्रेम, शांती अन बंधुभाव
कधीचा झाला हद्दपार
हद्दिवरती नित्य घडती
भुईसाठी युद्धे अपार
`
पाचोळ्यापरी मुडदे पडती
आक्रंदती कुणी, दुजे हसती
डोई फोडून माना चिरती
मुला-बायांच्या हत्या करती

तुझ्या पताका घेऊनी हाती
निष्पापींच्या रक्ती न्हाती
अशी कशी रे विकृत रीत ही?
सैतान माणसांत ऊपजती

भ्याड जेत्यांच्या पराक्रमाची
विपरीत रीत ही केलीस
नयन झाकूनी असशिल देवा
की तूच सैतानाच्या ओलीस?

सुरेश शिरोडकर >>>
२ डिसेंबर, २००८

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्यानंतर मी ही कविता लिहिली.

सोमवार, १३ ऑक्टोबर, २००८

जीर्ण वटवृक्ष


जीर्ण वडाचे एक झाड ते,
गतस्मृतीना स्मरते आहे
अजूनी सोसू किती उन्हाळे,
विवंचनेने मरते आहे

हिरवळ होती वसंती जेव्हा,
राहुटी थव्यांची होती तेव्हा
आता शिशीरी, पाने घळती,
घरटी सोडूनी रावे उडती

पोळत होता, ग्रिष्म तरूंना,
छाया दिधली वाटसरूंना
पिकली पाने, तळ पातेरा,
पांथस्तांना वाटा तेरा

पारंब्याही शिणल्या आता
वसुंधराही दुरावलेली
उन्मळणेही नाही माथी...
वटवाघूळे स्थिरावलेली

अस्तित्वाच्या सीमेवरती
तुफानाची वाट पाहते
जळुन राख होण्यासाठी
धरित्रीची शेज मागते

सुरेश शिरोडकर >>>
१० ऑक्टोबर २००८

शनिवार, ४ ऑक्टोबर, २००८

पडक घर



हृदयात चांदण्यांचे
दवबिंदू साठलेले
नव्हते मुळीच तेव्हा
आभाळ फाटलेले

मनी साठवून आशा
जग हिंडण्यास गेलो
या सांजवेळी का मी
पडक्या घरात आलो

कमवून मोल होतो
गमवून फोल झालो
मी कालचा कूबेर
ओसाड गावी आलो

सय अंतरात होती
प्रित बंधनात होती
तट तोडूनिया सारे
ढळली कशी ही नाती?

छत अंबरी ऊडाले
डोहात हेलकावे
सांगा मुक्या मनाने
आता किती सहावे

भेगाळले भिताड
शेवाळले छताड
दुभंगल्या मनाचे
सांधु कितेक छेद

वाडयास नाही वासे
वारुळ भग्न भासे
गांधील झोंबताना
घेवू कसे उसासे

ऊरी आर्त घाव आहे
कंठात कंप आहे
माझेच कर्मगीत
हा कोण गात आहे?

सुरेश शिरोडकर >>>
२ ऑक्टोबर २००८

सोमवार, २९ सप्टेंबर, २००८

मानवता (पुसू नका)




पंथ कोणता वंश कोणता
जात कूळ पुसू नका
मानवता हा एकच धर्मं
आप दुजा करू नका

क्षितीजावरती इंद्रधनुचा,
रंग कोणता पुसू नका
काळा गोरा दुजा मानुनी,
एकमेका डसू नका

अथांग निळया आकाशाची,
सीमा कोणती पुसू नका
आडातील मंडूकापरी,
चाकोरित जगू नका
.
भरकटलेल्या पतंगाची,
दिशा कोणती पुसू नका
तुमचा धागा त्याच्या हाती
सैरावैरा उडू नका

बहरलेल्या उदयानाचा,
गंध कोणता पुसू नका
चंदनासवे सहाण झिजते
सहाण सुगंधी समजू नका

खळखळणाऱ्यां सरितेचा,
उगम कोठे पुसू नका
शिखर गाठणे तुम्हा हाती
मार्ग कोणता पुसू नका

दोन करानी टाळी वाजते
डावा उजवा करू नका
एक पित्याची सारी लेकरे
तुच्छ कोणा लेखू नका

सुरेश शिरोडकर >>>
२५ सप्टेंबर, २००८

सोमवार, २५ ऑगस्ट, २००८

मायमराठी


कुल आमुचे असे मराठी...
आम्ही जाणतो मायमराठी

आमुच्या उरात दाटते मराठी, अंतरात डोलते मराठी
तनामनात धुंदते मराठी, मनगटात स्फुरते मराठी
नसानसांत सळसळे मराठी, कर्णि गुंजते मायमराठी

वनी दरवळे इथे मराठी, फुलां-मुलांत खेळते मराठी
तळयामळयात लहरते मराठी, कडीकपारी हिंडते मराठी
दरिदरीत वर्षते मराठी, सह्याद्रित गर्जते मायमराठी

अशी शौर्याची तलवार मराठी, मैदाने गाजवी मराठी
लाल मातीत लोळते मराठी, रंगायतनी रंगते मराठी
मंदिरात दुमदुमे मराठी, ईद्रायणी खळखळे मराठी

आमुची विरांची विराट मराठी, संतांची विराग मराठी
कैक पाहुणे पोसते मराठी, अमराठ्यांचे माहेर मराठी
चांदयापासून बांदयापर्यंत... घरा-घरांत नांदते मायमराठी

सुरेश शिरोडकर >>>23, August, 2008

मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

टाळकुटया



टाळ कुटण्यात वेळ दवडीला
अभंग न गाता गौळण गाईला ll ध्रु ll

सुरावटीवर अतिभार दिला
आधी कानडा मग यमन गाईला
मुखी आळवावा अभंग तुक्याचा
माना डोलविण्या दंग का फुकाचा llll

अभंगासी जोड टाळ मृदुंगाचा
टाळ नी मृदुंग घोष ना नामाचा
भजनी रंगुनी एकरुप हो रे
टाळांच्या गजरी अभंगही गा रे llll

भजनाविनाच हरिसी भजसी
अभंग न गाता टाळ का कुटिसी?
हरिच्या भजनी अभंगात गोडी
व्यर्थ कुटुनिया टाळ का रे फोडी? llll

राम नोहे बळे नाम न स्मरता
दाम कैसा फळे घाम न गाळता
जाणोनिया घ्या रे अभंगाचे सार
नका देऊ मात्र टाळावरी भार ll ll

तुझ्या जीवनाचा तूच बा अभंग
आप्त-इष्ट, सगे टाळ नी मृदुंग
कर्म करणे हेची भजन जाण
ठेवोनिया भान मार तुझी तान llll

सुरेश >>>९ ऑगस्ट २००८

सोमवार, २८ जुलै, २००८

वजाबाकी

+ _ + _ + _ + + _ + _ + _ + __ + _ + + _ + _ + _ + _ + _ +
+ _ + _
+ _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _
+ _ + _ + _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _
+ _ + _ + _ + _ + _ + _ + _ +
_ + _ + _ + _ + _ + _ + _ + _

= 0000


तू जीवनात आलीस अनं
बेरीज करून मिळवत बसलो
या मिळवणीच्या गणितात
कधी वजाबाकी नाही शिकलो

तू जीवनातून वजा होताना
वजावट शिकवुन गेलीस
फसवी माझी मिळकत
शुन्य शुन्य करून गेलीस

तू जीवनातून वजा होताना
नयनी अश्रु साठवुन राहिली
बेरीज-वजाबाकिच्या गणितात
तेवढीच माझी बाकी राहिली

चुकलेले हे गणित माझे
पुन्हा सोडवत नाही बसायचं
कोर्‍या पाटिकडे बघत आता
तुझ्याशिवाय जगत रहायचं

सुरेश शिरोडकर >>>
२६ जुलै २००८

गुरुवार, १० जुलै, २००८

स्वप्नभंग

.मध्यान्ह रात्र होती
मी स्वप्नी दंग होती
अशी झोप का उडाली
मम स्वप्ने भंग झाली

तरु उंच नभी उभे
तरुशिखरी घरटे माझे
तुफान कसे आले
तरु उन्मळुनी गेले
.पीक पोटरीत होते
वार्‍याशी डुलत होते
टोळधाड कुठुनी आली
पीक घळघळुनी गेली '

कदली उभी लवून
कंठी लोंगर लेवून
वात उंडरुनी आला
सोट कंबरेत दुडाला '

घर चंद्रमौळी माझे
नाही छत्र मज दुजे
वातचक्र कसे आले
छत अंबरी उडाले

अशी चांदरात होती
तार्‍यांची आस होती
काजवे कुठुनी आले
मन काळवंडून गेले '
.
किनार्‍यास माझी नांव
पल्याड माझे गांव
वादळ कुठुनी आले
तारु सागरी बुडाले
.
सुरेश >>>
जून २६, २००८
.
जून २००८ ह्या दिवशी S.S. C. चा निकाल होता आणि त्याच दिवशी मी ही कविता लिहिली होती.

बुधवार, ९ जुलै, २००८

माझी ऑरकुट मैत्रिण

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दर दिवशी दहा तरी ....
forwarded इमेल्स यावेत
आणि दुबळ्या माझ्या ईनबाँक्समध्ये junk मेल्स भरगच्च भरावेत

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दिवसाला दहा तरी
फक्त हाय... how r u.... असे msg. यावेत
आणि सकाळी क्षेमकुशल ऐकूनही पुन्हा दुपारी how r u.. असेच विचारावे

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीने दरदिवशी तीच्या आणि मित्रांच्याही ....
community जाँइन करायची विनंती करावी
आणि कधीतरी माझीच ommunity मला जाँइन करायची request पाठवावी

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जी दिवसातून दहा वेळा तरी....
ऑरकुटींगसाठी online असावी
आणि काल बोललेल्या संभाषणाची आज पुन्हा तीच टेप लावावी

असा माझा एखादा ऑरकुट कवीमित्र असावा
ज्याचे दिवसातुन दोन तरी ....
स्वतःच्या कवितेचे links यावेत
आणि त्याच्या दोन कविता वाचल्यावर एकतरी शेर सुचावा


- सुरेश
October, २००८

दयाघना


,
ये रे ये रे पावसा.... गाणं गायलं नाही
तुला देतो पैसा.... आमिष दावलं नाही
कधी नाही परी यंदा मृगापुर्वीच आलास
आला आला उच्चारता तोंड घेऊन गेलास

तप्त लाल धरणीला स्नान घालून गेलास...
हिरवी साडी नेसण्यापुर्वीच पिंगट का केलास?
वृक्ष-वल्ली झाडांना पाणी पाजून जगवलीस...
त्यांनाच आडवी पाडून त्यांची हाडे का मोडलीस?
चार दिवस चोहीकडे थुई थुई नाचलास...
नदी-नाले भरण्यापुर्वीच दडी मारून बसलास
भार-नियमनच्या राज्यात वीजा पाडून गेलास...
गरीबाच्या छप्पराचा कोळसा का केलास?

गावो-गांवी शेतकरी तुझाच धावा करेल...
यज्ञात बळी देईल, होम-हवन करेल
चातकापरी तोंड उघडून नभाकडे बघेल...
तू नाही द्रवलास तर आपलीच अश्रु गिळेल
गुरं-ढोर विकून जमीनी गहाण ठेवेल...
सारेच यत्न हरले की आत्महत्या करेल

सुका दुष्काळ जाहिर करून नेता दौरा करेल
हताश होउन बळीराजा भिका मागत फिरेल
घनांधच असतील कर्जमाफिला पात्र
पावसाविनाच पार पडेल पावसाळी सत्र

आम्हावरी कर अनुकंपा.. बा दयाघना
रुसून असा बसू नकोस.. बरस रे घना
तुझ्याबिना जगणार कसे.. सांग रे वरुणा
अंत आता पाहू नकोस.. बरस-बरस रे घना

सुरेश >>>
२१ जून २००८

कर झिला घराची आठवण


कोकणातून शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमन्याची कर्मभूमि जरी मुंबई असली तरी कोकण ही त्याची जन्मभूमि जननी आहे. त्या जननीची निदान आठवण तरी काढणे हे प्रत्येक चाकरमन्याचे कर्तव्य आहे.

अरे शहरी धन्या चाकरमन्या...
तूका कोंकण साद घालता
वरसातून एकदातरी भेटिक बोलयता
अरे पुता भेटाक बलयता

शहरात गेलंय चाकरी केलयं...
बघ कसो कनो वाकयलंय
पैश्यामागे लागान कित्यां घराक इसारलंय
अरे पोरा घरार पाणी सोडलंय

मातयेत लोळान मोठो झालंय...
आनी मातीक इसारलंय
मातीच्याच छातीवर बंगले उभारलंय
अरे लेका जमीन खावनं बसलंय

हुतुतू खेळलंय खोखो खेळलंय...
तेव्हा कसा मैदान गाजयलंय
फळकुटाच्या खेळापायी खेळाची वाट लायलंय
अरे गड्या खेळार ओस मारलंय

हापूस चोकून मिटके मारलंय...
तेव्हा बरो आंब्यार ताव मारलंय
तोरा चावान पोरां आता त्वांड आमट करतत
अरे बाबा तोंडार म्हावं मारलंय

शिकान-शिकान पदव्या घेतलंय...
आनी मोठो बॅरीस्टर झालंय
कोंन्व्हेंटमध्ये पोरांक शिकवून मराठी बिगड़लंय
अरे सायबा मराठीची वाट लायलंय

येक बरा केलंय रेल्वे हेलंय...
थोडोफार परवास सुखावलो
भैयाक वसरी दिलंय तूझो भावबंद दुखावलो
अरे भावा भावाशीक दुखयलंय

अरे इस्टेट् कमयं पैसो कमयं...
कर झिला घराची आठवण
वरसाक़ एकदा आयेक एक रुपयो पाठवं
कर झिला आवशीची आठवण

सुरेश >>> 
29.5.2008

मंगळवार, १० जून, २००८

प्रेम - कुंभाराचा घडा





प्रेम कुंभाराचा घडा ...
आधी भट्टीत भाजते, मग पिचुन सजते

प्रेम गुलाबाचे झाड ...
काटे तळाला बोचती, फुले शेंडयाला सजती
`
प्रेम चुल्यावरी तवा ...
आधी सोसावे चटके, मग मारावे मिटके
``
प्रेम मृगाच्या सरीपरी ...
सोसाटयाने गर्जत येते, कधी वादळ बनवून जाते
'
प्रेम खळखळणारी नदी ...
खळखळत सागरास मिळते, अनं त्यातच विलीन होते

'प्रेम बदलत्या ऋतूवाणी ...
कधी ऊन कधी पाणी, कधी बोचर्‍या थंडीवाणी

'प्रेम तळहाताच्या फोडापरी ...
जपा त्यासी जिवापाड, नका करू नजरेआड
'
प्रेम अळूपर्णातील थेंब ...
सावरावा सदा तोल, प्रेम असे बहुमोल
'सुरेश >>>
7 June, 2008

सोमवार, ३१ मार्च, २००८

ऊठ बा मानवा



असे झुंजूमुंजू झाले
आता झुंजूमुंजू झाले
अवघे चैतन्य लेवूनी
सकळ ब्रम्हांड जागले

कोंबड्याने बांग दिली
पाखरांना जाग आली
गोठ्यातली कपिलाही
पाडसाला साद घाली

डोलु लागे शेत सारे
पांघरुनी गार वारे
लाजरीच्या पर्णाचेही
रोमांचीत रोम सारे

उमलल्या जाईजुई
वात कसा गीत गाई
वनातल्या केकीलाही
नृत्याची जडली घाई

चेतावल्या दश दिशा
उजळल्या न्हाऊनीया
दवबिंदू प्राशुनीया
निशेला चढली नशा

उठीले कण-नी कण
उठीलेही नारायण
तूच बा मानवा असा
करीसी कुठे परायण?

वेळ असा कुणासाठी
नाही कधी रे थांबला
कालचक्राच्या फेर्‍यात
थांबला तो संपला....
थांबला तो संपला....

सुरेश शिरोडकर >>>8 April, 2008

मंगळवार, २५ मार्च, २००८

बालसखा - चंदू




प्रिय मित्रा रे सवंगड्या
बालपणीच्या बालसख्या
असा कसा रे पडला सांग
सांग तुझा रे विसर कसा

तुच दिली मज कैरी बोरे
आणि कधीतरी कांदा पोहे
तू शबरी अनं तूच सुदामा
भुलली कशी रे तुला गुलामा

जमवूनी सार्‍या आट्या-पाट्या
लंगडी, लपंडाव आणि गोट्या
कधी माळावर मुक्त हिंडलो
मस्त खेळूनी लटके भांडलो

बघता बघता मोठी झाले
गांव सोडूनी शहरी निघाले
नांव किर्तीच्या नादी लागुनी
मुर्ख खेळात मग्न राहीले

प्रपंचाच्या मग गाड्याखाली
नातिं आपुली धुसर झाली
वर्षामागुनी वर्षे उलटली
परी पुन्हा कधी न भेट जाहली

नाही पत्र नाही चिठ्ठी
नच झाल्या कधी भेटी-गांठी
एकेदिवशी तार समोर
CHANDU IS NO MORE

तार वाचली धरणी कापली
अश्रुंची मग नदी वाहिली
जड मनावर दगड ठेवूनी
दोन तपांनी गाववेस पाहिली

चंदयाची मग डायरी चाळली
धक्याने धरणीलाच खिळली
माझ्याच शहरी हाकेच्या अंतरी
चंदयाची चिता निवांत जळाली?

मैत्रिचे हे धागे सारे
कोण विणतो कोणास ठावे
काही कच्चे काही पक्के
परी गुंततात अनेक रावे

सुरेश शिरोडकर >>>
26 March, 2008

सोमवार, २४ मार्च, २००८

नवीन संकल्प नव्या वर्षाचे


वर्षे संपतात भराभर अनं संकल्प मात्र भाराभर
नवीन संकल्प नव्या वर्षाचे, पूर्ण केलेत का गतवर्षीचे ?

घेता शपथ सोडणार दारूचा छंद
आणि 31 डीसेंबरला नशा करून धूंद ?

वर्ष्याचे स्वागत फटाक्याने
मग निरोप का देता दारूने ?

बरे अनं वाईट, वर्ष संपते देऊन घाईत
पण तुम्ही का पीता फक्त आठवून वाईट ?

म्हणता नवीन वर्षात लाभू दे सुखशांती
मग मध्यपान करून का पसरवता अशांती ?

देता शुभेच्छा समृध्दीच्या अनं म्हणता होवो भरभराट
अनं त्यानाच पाजून, का करता त्यांच्याही संसाराचा तळतळाट ?

मानव जन्म मोलाचा, उद्धार करा कूळाचा
घोटू नको गुळाचा, नेम नाही काळाचा

आयुष्याला जुगार मानून खेळता का भाग्याशी
प्रयत्नांची धरा कास सुखे येतील घराशी

खुशाल जगा आपापल्या परीने, एकजूटिने अनं बंधुभावाने
सार्थक करा जन्माचे अनं घड़वा भविष्य राष्ट्राचे

वर्षामागून वर्षे गेलीत संकल्पांची टींगल केलीत
कूणी पाळले कूणी मोडले.. कूणी पाळूनी पुनः तोडले

पूरे हे फसवे संकल्प आता हाती घ्या प्रकल्प
विकास घडवा देशाचा... नका आणू वीकल्प

सोडूया दारूचा नाद अनं उज्वल करू भवितव्य
जीवन घडवू सार्थ हाची संकल्प .. हाच संकल्प...

सुरेश शिरोडकर >>>
2 January, 2008

बुधवार, ५ मार्च, २००८

ज्याची खावी पोळी त्यालाच दयावे सूळी ?

उगवतो बिचारा कणा-कणातून
पण शिक्षा भोगतो क्षणाक्षणाला

चर-चर कापतात विळ्याने
सुकवतात उन्हाच्या ज्वाळाने

मग देतात बैलांच्या पायी
अनं तुडवून रडवतात धायी-धायी

कोंडून मारतात वेताच्या तट्यात
नाहीतर कोंबतात गोणीच्या पोटात

सडतात कांडून मुसळाने
आणि पाखडून काढतात सुपाने

भरडून दळतात जात्याने
आणि मुरडून मळतात हाताने

बुचकून डुबवतात पाण्यात
अनं ठेचून रगडतात रगड्यात

चटके देतात भाजून तव्यावर
अनं तेल ओततात जखमेवर

हावरट पाहुणा सदा उपाशी
खातो लावून तूपाशी

स्वागत करतात मीळून सोळा-सोळा
आणि समाचार घेतात बत्तीस वेळा

घेउन हा पाहुणचार, आता तरी जावे घरात...
तर जिभ म्हणते मीही उभी दारात

लोळवून लाळावून खूप मारते
अनं चोथा करून गूहेत ढकलते

मोत्यासारखा टपोरी दाणा मातीतून उगवला
अनं मातीमोल होवून शेवटी मातीतच विलीन झाला...

दाण्या-दाण्यावर लिहीलेले असते खाणा-याचे नांव
पण दाणा मात्र खात असतो यातनांचे घाव.....

सुरेश >>>>>
Jan. 24, 2008

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २००८

गोदाबाईचा दिनक्रम

















रामपारी तांबड फुटलं कोंबडा आरवला
आणि गोदेचा दिनक्रम सुरु झाला

गोदेच्या जागण्याने कपिलाही उठली
अनं हंबरुन वासराला बोलाऊ लागली

गोठयात पाडसाला लुचवून आणलं
आणि लोटाभर दूध सवे काढून आणलं

डोकं चुलित घालून नळी फू-फू फुंकली
आणि थपाथपा चार भाक-या भाजल्या

कर्र-कर्र रहाटासंगे चार दुडी ओढल्या
बिगी-बिगी तुळशिला दोन फेर्‍या काढल्या

चाय न्ह्यारी करून धनी गेलं शेताकड़ं
तेव्हा कुठं बघीतलं आपल्याही तान्ह्याकड़ं

लेकिला उठवुन शाळेकड़ं धाडली
आणि मुसळ घेवून धान्याशी भांडली

थकून भागून जरा कुठं पडली
तर मेल्या कुत्र्यांनी बोंब मारली

कुठून एक सर बरसत आली रिमझीम
आणि परसात कापडं झाली ओलीचींब

जळली मेली लाकडं कधी सरली
आता कापड़ं वाळायां शेणींची पाळी ऊरली

पोरगी आली शाळेतून चार पाढे शिकून
कवतिक त्याचं केलं आपलंच अज्ञान झाकून

रात्री उष्टे-खरकट, भांडी-कुंडी झाली
मग ओवीसंगे जात्यावर साद घाली

रात्री कुठे धरतरीवर पडाया गेली
तर मागील दारी कुठे खुडूक झाली

दिवली घेऊन खूराड्यात पाह्यलं
अरेरे... कोल्ह्याने कोंबड नागवलं

सकाळ झाली ऊगवत किरणांनी न्हाली
पण गोदाबाईला जागच नाही आली

आकाशी कु-हाड कोल्ह्याच्या दाती
कोणाचं उठंण कोणाच्या हाती

सुरेश शिरोडकर >>>
8 March, 2008

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २००८

समजू नको अशी पायाची ही दासी













अरे अरे कवी राजा गर्व नको करु
अभिमानी बनुन असा अढी नको धरु
तुच माझा प्राणसखा तुच माझा तारु
अविचारी बनुनीया दूर नको सारु

अरे जीवनात मी आले तुझ्या
अनं कवी लागले नांवात तूझ्या
मग कविता पहिली की कवी आधी
अशा या खुळचटाच्या का रे नादी?

तुच लावलिस मला नादे
नव्हती लागली तूझ्या मागे
मग नसेल माझ्यात रस
तर तुझा अहंकार घेऊन बस

पटत कसे नाही तुला समजावु कीती
तोडू नको अशी ही जुळलेली नाती
कवी आणी कवितेचे नाते अंग-संग
जो माझ्यात दंग मीही त्याच्या संग

नाही मी एकपति की नाही पतिव्रता
माझ्या मागे आहे हजारोंचा जथा
नसेल तूला गरज तर खूशाल जा परत
मीही नाही बसणार विरहाने झुरत

आयुष्यात आले कीती अनं गेले कीती
गणती त्याची ठेवायची माझी नाही नीती
नसेल मला बाजारभाव मला नाही हाव
पण माझे भांडवल करून खाऊ नकोस भाव

असेन मी बाजारु मला त्याची लाज नाही
आहेच मी विकावू मला त्याची तमा नाही
पण समजू नको अशी पायाची ही दासी
जरी अडकली तुझ्या लेखणीच्या घसी


- सुरेश
Feb. 11, 2008


गारगोटीला लोटू नका









'
'
'


या संसाररूपी महासागरात
हिरे-मोती, गारगोटीचाहि साठा आहे
त्यातून अचूक रत्न वेचण्याचा
तुमचा आमचा वाटा आहे
.
हिरे-मोती वेचण्यात
सगळ्यांचाच कल असतो
हाच तर शंख-शींपले अनं
गारगोटीचा छल असतो
'
हिरे-मोती वेचताना
गारगोटया लोटू नका
मुल्यवान नाही म्हणून
पायदळी तुडवू नका

मूठभर हिरे घेउनी
समाधानी का रे होता?
ओंजळ भरा काटोकाट
घ्या भरीस गारगोट

हिरे-मोती जतन करणे
हा तर तुमचा ह्क्क्च आहे
पण गारगोटीला हिरा बनवणे
हिच तर खरी कला आहे
.
गारगोटीला हिरा बनवणे
शक्य नसल्यास बनवु नका
पण दगड-धोंडा समजुन
मातीमोल करू नका
.
या अथांग महासागरात
कलाकारांची काय कमी आहे?
मग अशा गरगोटयांनाही
हिरा बनण्याची हमी आहे
'
सुरेश >>>
Dec. 13, 2007

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २००८

विक्रमादीत्याची व्यथा






विरांची ही विराट नगरी
शुरांची ही रणभूमी
जिथे तयांची गातात किर्ती
तिथे जन्मली एक लहान मूर्ती

रणांगणी या चेंडूफळीच्या
ठिकर्‍या उडवुनी गोलंदाजांच्या
विक्रम करणार्‍या या विक्रमादित्यालाच
सोसावा लागतो आज टिकेचा मारा

खेळला तर म्हणतात त्यात काय विशेष
नाहीतर करतात टिकेचा अभिषेक
मारावं शतक तर म्हणतात स्वार्थी
नाहीतर पाडतात धारातिर्थी

चेहरा त्याचा पाहूनी गोंडस
मियाँ म्हणाला बाटली दया तोंडात
पण हाणताच षटकार कादिरला
क्रिकेटविश्व हादरला


मूठमाती देऊनी स्वतःच्या पित्याला
गेला रणांगणात पुनः लढायला
पण म्हणतात कसे खूळचटपटू
मिळतात नोटा म्हणून लढतो बेटा

डॉनही वदले बोलावूनी घरा
माझ्यासम हाच खरा
पण महाभागांच्या अकलेचा तोरा
याच्यापेक्षा धोबी बरा

शारजात होता प्रसंग बाका
त्यात आला वादळाचा धोका
पण जिद्दीने लढला खंदाविर
नाही रोखू शकले कांगारुंचे तीर

मँच फिक्सिंग घडले त्याच्याच काळात
पण कधी नाही गोवला बुकींच्या गळात
गर्वाने खेळला देशासाठी सदा
नाही आणली देशहितावर गदा

गुरूजीनीही सोडला फूसका बाण
आता नाही ऊरला त्याच्यात राम
पण गुरूजी झाले वनवासी
अन त्यानेच गाळला खरा घाम

एकच कर्ण नी एकच अर्जुन
एक भिष्म अन एक अभिमन्यू
युगामागुनी युगे गेली
नाही जन्मले दुसरे अजुन

मग...
ध्यानी ठेवा हो अज्ञान्यांनो
इतिहासाची ही परंपरा
झाले बहु होतील बहु
परंतु या सम हाच खरा
याच्या सम हाच खरा...

सुरेश >>>>

Dec. 2, 2007