या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, २५ ऑगस्ट, २००८

मायमराठी


कुल आमुचे असे मराठी...
आम्ही जाणतो मायमराठी

आमुच्या उरात दाटते मराठी, अंतरात डोलते मराठी
तनामनात धुंदते मराठी, मनगटात स्फुरते मराठी
नसानसांत सळसळे मराठी, कर्णि गुंजते मायमराठी

वनी दरवळे इथे मराठी, फुलां-मुलांत खेळते मराठी
तळयामळयात लहरते मराठी, कडीकपारी हिंडते मराठी
दरिदरीत वर्षते मराठी, सह्याद्रित गर्जते मायमराठी

अशी शौर्याची तलवार मराठी, मैदाने गाजवी मराठी
लाल मातीत लोळते मराठी, रंगायतनी रंगते मराठी
मंदिरात दुमदुमे मराठी, ईद्रायणी खळखळे मराठी

आमुची विरांची विराट मराठी, संतांची विराग मराठी
कैक पाहुणे पोसते मराठी, अमराठ्यांचे माहेर मराठी
चांदयापासून बांदयापर्यंत... घरा-घरांत नांदते मायमराठी

सुरेश शिरोडकर >>>23, August, 2008

मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

टाळकुटया



टाळ कुटण्यात वेळ दवडीला
अभंग न गाता गौळण गाईला ll ध्रु ll

सुरावटीवर अतिभार दिला
आधी कानडा मग यमन गाईला
मुखी आळवावा अभंग तुक्याचा
माना डोलविण्या दंग का फुकाचा llll

अभंगासी जोड टाळ मृदुंगाचा
टाळ नी मृदुंग घोष ना नामाचा
भजनी रंगुनी एकरुप हो रे
टाळांच्या गजरी अभंगही गा रे llll

भजनाविनाच हरिसी भजसी
अभंग न गाता टाळ का कुटिसी?
हरिच्या भजनी अभंगात गोडी
व्यर्थ कुटुनिया टाळ का रे फोडी? llll

राम नोहे बळे नाम न स्मरता
दाम कैसा फळे घाम न गाळता
जाणोनिया घ्या रे अभंगाचे सार
नका देऊ मात्र टाळावरी भार ll ll

तुझ्या जीवनाचा तूच बा अभंग
आप्त-इष्ट, सगे टाळ नी मृदुंग
कर्म करणे हेची भजन जाण
ठेवोनिया भान मार तुझी तान llll

सुरेश >>>९ ऑगस्ट २००८