या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, ३१ मार्च, २००८

ऊठ बा मानवा



असे झुंजूमुंजू झाले
आता झुंजूमुंजू झाले
अवघे चैतन्य लेवूनी
सकळ ब्रम्हांड जागले

कोंबड्याने बांग दिली
पाखरांना जाग आली
गोठ्यातली कपिलाही
पाडसाला साद घाली

डोलु लागे शेत सारे
पांघरुनी गार वारे
लाजरीच्या पर्णाचेही
रोमांचीत रोम सारे

उमलल्या जाईजुई
वात कसा गीत गाई
वनातल्या केकीलाही
नृत्याची जडली घाई

चेतावल्या दश दिशा
उजळल्या न्हाऊनीया
दवबिंदू प्राशुनीया
निशेला चढली नशा

उठीले कण-नी कण
उठीलेही नारायण
तूच बा मानवा असा
करीसी कुठे परायण?

वेळ असा कुणासाठी
नाही कधी रे थांबला
कालचक्राच्या फेर्‍यात
थांबला तो संपला....
थांबला तो संपला....

सुरेश शिरोडकर >>>8 April, 2008

मंगळवार, २५ मार्च, २००८

बालसखा - चंदू




प्रिय मित्रा रे सवंगड्या
बालपणीच्या बालसख्या
असा कसा रे पडला सांग
सांग तुझा रे विसर कसा

तुच दिली मज कैरी बोरे
आणि कधीतरी कांदा पोहे
तू शबरी अनं तूच सुदामा
भुलली कशी रे तुला गुलामा

जमवूनी सार्‍या आट्या-पाट्या
लंगडी, लपंडाव आणि गोट्या
कधी माळावर मुक्त हिंडलो
मस्त खेळूनी लटके भांडलो

बघता बघता मोठी झाले
गांव सोडूनी शहरी निघाले
नांव किर्तीच्या नादी लागुनी
मुर्ख खेळात मग्न राहीले

प्रपंचाच्या मग गाड्याखाली
नातिं आपुली धुसर झाली
वर्षामागुनी वर्षे उलटली
परी पुन्हा कधी न भेट जाहली

नाही पत्र नाही चिठ्ठी
नच झाल्या कधी भेटी-गांठी
एकेदिवशी तार समोर
CHANDU IS NO MORE

तार वाचली धरणी कापली
अश्रुंची मग नदी वाहिली
जड मनावर दगड ठेवूनी
दोन तपांनी गाववेस पाहिली

चंदयाची मग डायरी चाळली
धक्याने धरणीलाच खिळली
माझ्याच शहरी हाकेच्या अंतरी
चंदयाची चिता निवांत जळाली?

मैत्रिचे हे धागे सारे
कोण विणतो कोणास ठावे
काही कच्चे काही पक्के
परी गुंततात अनेक रावे

सुरेश शिरोडकर >>>
26 March, 2008

सोमवार, २४ मार्च, २००८

नवीन संकल्प नव्या वर्षाचे


वर्षे संपतात भराभर अनं संकल्प मात्र भाराभर
नवीन संकल्प नव्या वर्षाचे, पूर्ण केलेत का गतवर्षीचे ?

घेता शपथ सोडणार दारूचा छंद
आणि 31 डीसेंबरला नशा करून धूंद ?

वर्ष्याचे स्वागत फटाक्याने
मग निरोप का देता दारूने ?

बरे अनं वाईट, वर्ष संपते देऊन घाईत
पण तुम्ही का पीता फक्त आठवून वाईट ?

म्हणता नवीन वर्षात लाभू दे सुखशांती
मग मध्यपान करून का पसरवता अशांती ?

देता शुभेच्छा समृध्दीच्या अनं म्हणता होवो भरभराट
अनं त्यानाच पाजून, का करता त्यांच्याही संसाराचा तळतळाट ?

मानव जन्म मोलाचा, उद्धार करा कूळाचा
घोटू नको गुळाचा, नेम नाही काळाचा

आयुष्याला जुगार मानून खेळता का भाग्याशी
प्रयत्नांची धरा कास सुखे येतील घराशी

खुशाल जगा आपापल्या परीने, एकजूटिने अनं बंधुभावाने
सार्थक करा जन्माचे अनं घड़वा भविष्य राष्ट्राचे

वर्षामागून वर्षे गेलीत संकल्पांची टींगल केलीत
कूणी पाळले कूणी मोडले.. कूणी पाळूनी पुनः तोडले

पूरे हे फसवे संकल्प आता हाती घ्या प्रकल्प
विकास घडवा देशाचा... नका आणू वीकल्प

सोडूया दारूचा नाद अनं उज्वल करू भवितव्य
जीवन घडवू सार्थ हाची संकल्प .. हाच संकल्प...

सुरेश शिरोडकर >>>
2 January, 2008

बुधवार, ५ मार्च, २००८

ज्याची खावी पोळी त्यालाच दयावे सूळी ?

उगवतो बिचारा कणा-कणातून
पण शिक्षा भोगतो क्षणाक्षणाला

चर-चर कापतात विळ्याने
सुकवतात उन्हाच्या ज्वाळाने

मग देतात बैलांच्या पायी
अनं तुडवून रडवतात धायी-धायी

कोंडून मारतात वेताच्या तट्यात
नाहीतर कोंबतात गोणीच्या पोटात

सडतात कांडून मुसळाने
आणि पाखडून काढतात सुपाने

भरडून दळतात जात्याने
आणि मुरडून मळतात हाताने

बुचकून डुबवतात पाण्यात
अनं ठेचून रगडतात रगड्यात

चटके देतात भाजून तव्यावर
अनं तेल ओततात जखमेवर

हावरट पाहुणा सदा उपाशी
खातो लावून तूपाशी

स्वागत करतात मीळून सोळा-सोळा
आणि समाचार घेतात बत्तीस वेळा

घेउन हा पाहुणचार, आता तरी जावे घरात...
तर जिभ म्हणते मीही उभी दारात

लोळवून लाळावून खूप मारते
अनं चोथा करून गूहेत ढकलते

मोत्यासारखा टपोरी दाणा मातीतून उगवला
अनं मातीमोल होवून शेवटी मातीतच विलीन झाला...

दाण्या-दाण्यावर लिहीलेले असते खाणा-याचे नांव
पण दाणा मात्र खात असतो यातनांचे घाव.....

सुरेश >>>>>
Jan. 24, 2008