या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

सैतान कृत्य


कधी मंदिरी कधी राऊळी
कधी मशीदित शोधती
हिंदू-मुस्लिम, शिख-ईसाइ
ईश आप-दुजी वाटती

कुणी म्हणती ईश प्रभुला
कुणी येशू तर कुणी अल्ला
हिंस्त्र श्वापदे बनली सारी
करीती जनावरांपरी हल्ला

प्रेम, शांती अन बंधुभाव
कधीचा झाला हद्दपार
हद्दिवरती नित्य घडती
भुईसाठी युद्धे अपार
`
पाचोळ्यापरी मुडदे पडती
आक्रंदती कुणी, दुजे हसती
डोई फोडून माना चिरती
मुला-बायांच्या हत्या करती

तुझ्या पताका घेऊनी हाती
निष्पापींच्या रक्ती न्हाती
अशी कशी रे विकृत रीत ही?
सैतान माणसांत ऊपजती

भ्याड जेत्यांच्या पराक्रमाची
विपरीत रीत ही केलीस
नयन झाकूनी असशिल देवा
की तूच सैतानाच्या ओलीस?

सुरेश शिरोडकर >>>
२ डिसेंबर, २००८

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्यानंतर मी ही कविता लिहिली.