या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

तिमीर

तेजोमयी दिपोत्सवी,
तिमीर वरचढ ठरला
दारी विझवून वाती त्याने,
सैराट पक्षी हेरला

अकाल काळपाश पडला
विहग बंदिस्त जाहला
गजब झडप... कंठशोष
द्विजराय गतप्राण झाला

आक्रंदुनी पिले-पांखरे,
सैरावैरा पळू लागली
घरट्यामाजी कोलाहल
पक्षीण टाहो फोडू लागली

चहू दिशांनी चिता पेटली,
सगे विसावले झाळीत
सभोवताली बघे बैसले,
मीठ टाकती आगीत

निष्पर्ण डहाळ्या हलू लागल्या
रावे फडफड करू लागले
पक्षीणीच्या चोचीबीना,
स्वये दाणे टिपू लागले

पिलावळीचे रुदन झाले
डोकीवरती मुंडन झाले
एक पक्ष घरटी उबवूनी,
आभाळ यात्री दिगंतरा गेले

नयनी वाती पुन्हा पेटल्या,
पक्षीण खोप्यात झुरु लागली
फिक्या फटफटीत आभाळी,
कृष्ण चंद्र निरखू लागली

सुरेश >>>
११-११-२००८

मंगळवार, २२ डिसेंबर, २००९

छडा लागला रे (गझल)


तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे

मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे

अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे

फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे

तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला रे

पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे

सुरेश >>>
१४-१२-२००९

शुक्रवार, ५ जून, २००९

वात्सल्यसिंधु


















लावण्यखणी राणी, कुरंगनयना नारी
मितभाषी राजकन्या, वात्सल्यसिंधु भारी

दावुनी बोट तिजला, करती कुचाळ खोक
रूपगर्विता घमेंडी, म्हणती हसून लोक

टोचोनी जो तो बोले, देती उगाच दोष
गिळूनी जनांचे दंश, शमवी मनीचा त्वेष

ललनेस दुःख भारी, सांगेल कुणा कैसी
वरिता कठोर भासे, अंतरी साय जैसी

एकेदिनी परंतु, ऐकोनी आर्त टाहो
तोडोनी बंध सारे, तत्क्षणी घेई घावो

उचलूनी अर्भकास, भाळास भाळ लावी
व्याकुळ भूके बाळ, नयनांत तिच्या पाही

कवळूनी तान्हुल्यास, धरिले कुशीत जेव्हा
भळभळा स्तन्य वाहे, माय मातृकेचे तेव्हा

स्त्रवला ऊरात पान्हा, निजला पिऊनी कान्हा
विसरून पार गेली, पाळण्यात तिचा तान्हा

समजुन मूढ गेले, सौष्ठव कवडीमोल
रूप-बोल सारे फोल, वात्सल्य बहुमोल

सुरेश शिरोडकर >>>
 ४ जून, २००९

गुरुवार, २८ मे, २००९

निसर्गराजा (मालवणी)

उद्योग नाय धंदो, पोटापाण्याचो वांदो
झिलाच्या मनीऑर्डरवर बापाची नजार
निसर्गाच्या मर्जीवर कोकणाची मदार

आंब्यार मोहर फुटता, काजीर तवुर दिसता
झाडापेडाक लागता मळबटीची नजार
कसा वाजवचा आता चेडवाचा काजार?

भिरंडीर धोडे फुटतत, रंटूल तांबडे दिसतत
वैशाखात घालता वारो पाऊस धुमशान
भिरंडीच्या मुळार पडता रतांब्याचा शान

सुरंगीर कळो फुटता, देळ्यान देळो फुलता
वळीवाच्या पाऊसाक जोर खयसून येता
सोन्यावाणी पिवळो कळो ठिक्क काळो पङता

भाजी पोरसा पोसतत, हरयी दिसाक लागतत
ह्या सरकारी भार-नियमनचा धुमता असा मढा
मिरशेंगांच्या ताडार हडकी ढवळी हाडा

भातां पिवळी दिसतत, पिकान कन्यात वाकतत
पुनवसाचो तरणो पाऊस सरायक रीघ धरता
भातां निजान आडवार तरवो रुजान वाडता

आदो-मिरग सरता, पाऊस दडान बसता
बैल गेल्यार कुळवाडी झोपो असो करता
पुनवसात उतव बानान मळबाकडे बघता

निसर्गराजा कोकणात, झिम्मा-फुगडी घालता
निसर्गाच्या मेहरबानीवर झाडार पैसो दिसता
नायतर कोकणचो राजा झाडार हाडा टांगता

सुरेश शिरोडकर >>>
२६ मे २००९

शनिवार, २ मे, २००९

बुजगावणे



जेव्हा...
एक सच्चा चितारी समजून,
एका निष्पाप चित्ररेखेसारखी
तुझ्या रंगानी रंगत गेले;
तेव्हा...
तूझे ते रंगवणे "बोचकारणे" असेल;
याची पुसटशीही कल्पना नव्हती.

अरे रंगलाल...
रंगीला बनून, चेहर्‍यावर रंग फासून,
एका निष्पाप बाहुलीचे "बुजगावणे" बनवशील;
या तुझ्या रंगढ़ंगाची मुळीच जाण नव्हती.
बुजगावणे बनवून, मळ्यात रोवण्यापेक्षा;
ताईत बनवून, गळ्यात टांगली असतीस तर?
आयुष्यभर लटकत राहिले असते;
जन्मभर तुझीच पडछाया बनून,
तुझ्याबरोबर भटकत राहिले असते.

पण आता...
आता, मी बुजगावणे असून सुद्धा;
पीकाला सवकलेल्या "लंपटांना"
मुळीच बुजवित नाही.
हल्ली, अगदी बुजरे सुद्धा मला बिचकत नाहीत.
कुंपणानेच शेत खाल्यावर;
बुजगावणे तरी काय कामाचे?

सुरेश शिरोडकर >>>

शनिवार, २४ जानेवारी, २००९

दुही

का हो माजविता माणसात दुही
दूध नासवुनी कशापायी दही
पेटविता का हो सलोख्याची होळी
पिठ आंबवून कोणास आंबोळी

फुले कुस्करुनी कोणास ही शेज
अबलांच्या माथी का काजळाचे तेज
कोण गणगोत कोणाशी रक्षीता
श्वान बनुनीया पिंड का भक्षीता

कोणत्या शौर्याचे गाता हे पोवाडे
सताड ऊघडा गवाक्ष कवाडे
कोणत्या जयाचे ढोल बढवीता
नि:ष्पापींचे बळी कुणा चढवीता

कोणत्या जयाची ऊभारीता गुढी
तुम्हां पायतळी तुमचीच मढी
कुठल्या रंगाच्या पताका या हाती
स्वजन रक्ताचे डाग तुम्हां माथी

कुठल्या धर्माचे कुराण वाचीता
माणसे मारुनी काय हो संचीता
कोणत्या प्रभूला मनी साठवीता
जनी रक्तपात धर्मं बाटवीता

मानव्य रक्षण माणसाच्या हाती
सावजास आहे शिकार्‍याची भीती
माणसाची आज बिघडली मती
माणसास आहे माणसाची भीती

सुरेश शिरोडकर >>>
१७, जानेवारी २००९