या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, ३१ मार्च, २००८

ऊठ बा मानवा



असे झुंजूमुंजू झाले
आता झुंजूमुंजू झाले
अवघे चैतन्य लेवूनी
सकळ ब्रम्हांड जागले

कोंबड्याने बांग दिली
पाखरांना जाग आली
गोठ्यातली कपिलाही
पाडसाला साद घाली

डोलु लागे शेत सारे
पांघरुनी गार वारे
लाजरीच्या पर्णाचेही
रोमांचीत रोम सारे

उमलल्या जाईजुई
वात कसा गीत गाई
वनातल्या केकीलाही
नृत्याची जडली घाई

चेतावल्या दश दिशा
उजळल्या न्हाऊनीया
दवबिंदू प्राशुनीया
निशेला चढली नशा

उठीले कण-नी कण
उठीलेही नारायण
तूच बा मानवा असा
करीसी कुठे परायण?

वेळ असा कुणासाठी
नाही कधी रे थांबला
कालचक्राच्या फेर्‍यात
थांबला तो संपला....
थांबला तो संपला....

सुरेश शिरोडकर >>>8 April, 2008

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा