या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

पक्षिण

मी कैदी पक्षिण, पायांत बेडी
अस्मानवेडी होते खुळी
शुन्यात फिरते, पिंजर्‍यात झुरते
उडायची मुभा मज नाही मुळी

भिरभिर फिरुनी, दाणे टिपावे
तुटूनी पडावे कणीसांवरी
कटोरीत खाते, ओंजळीने पिते
अल्लड पाखरू कारागृही

वार्‍याशी बिलगोनी, किलबिल गावे
वाटे झुलावे डहाळीवरी
अता पापण्यांच्या हलती डहाळ्या
अगतिक कसरत तारेवरी

फुलवून पंख, नभ पांघरावे
स्वैर विहार करावा जळी
कंठात दोर, नाकात तार
स्वैराचारास पडली बळी

उंच उडावे, झोकोनी द्यावे
ढगांशी करावा कधी सामना
पक्ष खुटारू, झुरूमुरू घारु
लुळ्या पाखराच्या मुक्या यातना

फोडोनी टाहो, तोडोनी दावे
लक्ष्य बनावे निषादापुढे
उडणेही नाही, मरणेही नाही
गाते विराणी बहिर्‍यापुढे

सुरेश >>>
१८.०८.२०१०