या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, ९ जुलै, २००८

दयाघना


,
ये रे ये रे पावसा.... गाणं गायलं नाही
तुला देतो पैसा.... आमिष दावलं नाही
कधी नाही परी यंदा मृगापुर्वीच आलास
आला आला उच्चारता तोंड घेऊन गेलास

तप्त लाल धरणीला स्नान घालून गेलास...
हिरवी साडी नेसण्यापुर्वीच पिंगट का केलास?
वृक्ष-वल्ली झाडांना पाणी पाजून जगवलीस...
त्यांनाच आडवी पाडून त्यांची हाडे का मोडलीस?
चार दिवस चोहीकडे थुई थुई नाचलास...
नदी-नाले भरण्यापुर्वीच दडी मारून बसलास
भार-नियमनच्या राज्यात वीजा पाडून गेलास...
गरीबाच्या छप्पराचा कोळसा का केलास?

गावो-गांवी शेतकरी तुझाच धावा करेल...
यज्ञात बळी देईल, होम-हवन करेल
चातकापरी तोंड उघडून नभाकडे बघेल...
तू नाही द्रवलास तर आपलीच अश्रु गिळेल
गुरं-ढोर विकून जमीनी गहाण ठेवेल...
सारेच यत्न हरले की आत्महत्या करेल

सुका दुष्काळ जाहिर करून नेता दौरा करेल
हताश होउन बळीराजा भिका मागत फिरेल
घनांधच असतील कर्जमाफिला पात्र
पावसाविनाच पार पडेल पावसाळी सत्र

आम्हावरी कर अनुकंपा.. बा दयाघना
रुसून असा बसू नकोस.. बरस रे घना
तुझ्याबिना जगणार कसे.. सांग रे वरुणा
अंत आता पाहू नकोस.. बरस-बरस रे घना

सुरेश >>>
२१ जून २००८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा