या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या सर्व रचना स्वरचित असून, रचनांच्या मुद्रणाचे वा अन्य कोणत्याही प्रकारे प्रकाशनाचे सर्वाधिकार मी स्वत:कडे राखून ठेवलेले आहेत. योग्य परवानगिशिवाय कुणीही या कवितांचा कुठेही वापर करू नये ही विनंती.

© सुरेश शिरोडकर.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

यमधर्म

तू येशील याची चाहूल लागली होती
पण यमद्वितीयेदिवशी येशील अशी कल्पना नव्हती.
भर दिवाळीत रंगाचा बेरंग करताना...
यमीलाही विसरशील असे वाटले नव्हते

भर दिपवाळीत दिवा मालवून ...
आकाशकंदीलात काळोख पसरवलास
भाउबिजेदिवशी भाईला उठवून...
निरांजनीच्या वाती विझवल्यास.

तीनशे पासष्ट दिवस विनाशकार्य करतोस...
यमद्वितीयेदिवशी सुध्दा तुलाच सुट्टी नाही ?
भाउबिजेदिवशी बहिणीना रडवतोस...
तुझ्या नोंदवहित एखादा वर्ज्यदिन सुध्दा नाही ?

तुला दोष देण्यात तरी काय तथ्य
सटविने लिहीले प्रारब्धी, तेच अंतिम सत्य
जन्ममरणाच्या फेर्‍यात, तूच एक अटळ सत्य
नातीगोती, आप्तेष्ट बाकी सर्व मिथ्य.

पण माझी एक विनंती ऐकशील का रे?
मला न्यायला येशील तेव्हा सणासुदीला येऊ नकोस
काही दिवस अगोदर आलास तरी चालेल
पण दिवाळीच्या रोषणाईत अंधःकार पसरु नकोस.


- सुरेश
22.11.2008

मी इथे जे लिहिले आहे ती कविता नसून मनातले विचार शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला इतकंच.